आता माझ्याकडे एक असलेली फॅमिली, ज्यांची मी गोष्ट येथे लिहीत आहे. सत्तरी ओलांडलेल्या सासूबाई, तर पन्नाशी ओलांडलेली वैद्यकीय व्यवसाय करणारी त्यांची सून, मुलगा सुद्धा डॉक्टर. त्याच्या निवडीनुसार सून डॉक्टर ! खरंतर सासूबाईंना फार शिकलेली सून नको होती; कारण ती आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटेल ही भीती. मात्र मुलाच्या लग्नाच्या वेळी ही अट पक्की होती. लग्न करणाऱ्यांनच एकदा ‘डॉक्टर मुलगी हवी ‘ तीही ‘स्त्रीरोगतज्ञ ‘, हा निकष ठरवला, की सौंदर्य, खानदान, पैसा इत्यादी निवडीच्या मर्यादा ठरून जातात.
मुलाचा डोळा अर्थात बायकोच्या डिग्रीवर जास्त होता. स्त्रीरोगतज्ञ बायको मिळवून त्यांना आपल्या सहध्यायींमध्ये कॉलर ताठ केली. पोरगा खुश, म्हणून आई जेमतेम खुश.आशा वातावरणात सुने गृहप्रवेश प्रवेश केला.
पहिली गोष्ट तिच्या लक्षात आली होती ती म्हणजे, वैद्यकीय तज्ञ म्हणून तिला कौटुंबिक कामांमध्ये कुठलीही सवलत नव्हती. सासू जुन्या रुढीची. खाली दवाखाना वर घर. ती एखादी अवघड प्रस्तुती करून थकून वर आली, तरी तिनं आंघोळ करूनच स्वयंपाक घरात प्रवेश करावा, काय हवं-नको ते बघावं, ताजा कुकर लावावा, भाजी टाकावी, नातवांचं खाणं-पिणं पहावं, अशी सासूची इच्छा.
व्यवसायाच्या सुरुवातीला महिन्यातून दोन-तीन वेळा प्रसूतीचे प्रसंग येत, त्यावेळी ठीक. मात्र पुढे रुग्ण वाढल्यावर प्रत्येक वेळी आंघोळ म्हणजे म्हशीसारखं पाण्यातच डुंबून राहायचं काम ! अखेर सुनेने या गोष्टीला ठाम विरोध केला. मुलगा मध्ये पडला, तेव्हा सासूबाई धुसफुसत तयार झाल्या.
मात्र छोट्या छोट्या मुद्द्यांवरून खटके उडत राहिले. स्वयंपाकाला बाई आणली, की ती स्वच्छच नाही, कपबश सुनेनेच विसळून टाकाव्यात- नाहीतर भांडी घासणारी ती त्या फोडते ! फरशी पुसताना मोलकरणीला आपणच टोपणभर द्रावण काकून द्यावं, पेपरवाल्याचे खाडे कॅलेंडर नोंदवून ठेवावेत…..एक ना दोन ! आपण कमावते आहोत, तेव्हा सासूनं एवढ्या बारक्या गोष्टींकडे लक्ष देऊ नये, अशी सुनेची अपेक्षा. मात्र सारं आयुष्यभर काटकसरीनं संसार करण्यात गेलेल्या सासूबाईंना हिशोब ठेवण्याचा सोस आणि त्याचा अभिमान. ‘ पैसे झाडाला लागतात का ?’ इथपासून ‘ प्रश्न पैशाचा नाही नोकर माणसं सोकावू नयेत ‘, इथपर्यंत सारे संवाद सुनेला ऐकावे लागायचे.
नवऱ्याजवळ तक्रार करूनही काही फायदा नाही, हे बायकोच्या लगेच लक्षात आलं. वडिलांच्या माघारी आईने आम्हाला सांभाळलं, मोठं केलं. आता या वयात तिला दुखावावं अशी माझी इच्छा नाही. तू दुर्लक्ष कर. जमेल, पटेल तेवढं करायचं. बाकी हो-हो करायचं. हळूहळू तीच आग्रह सोडून देईल”. असं म्हणून नवऱ्याने प्रश्न निकालात काढला. त्याची बायकोला पूर्ण साथ होती, मात्र आईला थेट बोलणं त्याला योग्य वाटत नव्हतं.
एक तर तो आईला पूर्ण ओळखून होता. गरिबीतून संसार वर आणण्यासाठी तिने अपार कष्ट घेतलेले घेतले होते हे खरं. मात्र कर्मठ मतं, आपण जे करतो, समजतो तेच योग्य आणि नव्या पिढीला काय कुणालाच आपल्यासारख्या व्यवहार जमत नाही, ही ठाम समजूत, या त्रयीवर तिचं व्यक्तिमत्त्व उभं होतं. जिथे नवऱ्यालाच ती मोजत नव्हती, तिथे सुनेला काय सोडणार ?
सासु-सुनेचा संघर्ष वाढत चालला. ‘नवऱ्याने दुर्लक्ष कर, हो ला हो कर ‘, म्हणणं सोपं होतं. प्रत्यक्षात ते अमलात आणणं कठीण होतं. कधी कधी दवाखान्यात उद्भवलेल्या समस्यांनी बायकोचं मन अस्वस्थ झालेलं असे. तरी घरी आल्यावर तिला पूर्ण मानसिक शांतता हवी असे. अशावेळी सासूच्या बोलण्याचा स्वर, रोख एखादा सुस्कारा, अगदी एखादा हेटाळणी वजा कटाक्षही तिच्या सहनशक्तीचा कडेलोट करणारा होऊन जाई. अशा वेळी नवऱ्याचा सारा उद्देश नाल्यात जाई. तिची मनस्थिती समजून समजण्याची सासूची इच्छाही नव्हती आणि क्षमताही. मग वादविवादाचा भडका उडे.
अखेर नवऱ्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. ‘दवाखाना शहराच्या व्यावसायिक इलाख्यात हवा ‘ असा मनसुबा जाहीर करून त्यांनं प्रथम बायकोचा तपासणी कक्ष हलवला. मग तिथेच जवळ जागा घेऊन प्रशस्त घर बांधलं. बायकोचा व्यवसाय हळूहळू नव्या जागीच स्थिरावला. नवऱ्याचा एक भाऊ बांधकाम व्यवसायानिमित्त वेगळा झाला होता.आणि आता एकाच गावात तीन घरं झाली. सासू आता अलटून पलटून दोन्ही मुलांच्या घरी जाऊन राहू लागली. नातवंड सांभाळू लागली. बायकोच्या वाट्याला वर्षाचे दोन ते तीन महिने आले. आधीपेक्षा हे वाईट नव्हतं, मात्र आता एकदा स्वतंत्र्याची सवय लागली की, त्या स्वातंत्र्यावर थोडीशीही गदा नको वाटते. शिवाय वयानुसार सहन करण्याची शक्ती संपुष्टात आलेली असते.
वेगळं घर केल्यापासून सुनेनं आपली दैनंदिन बऱ्यापैकी मनासारखी करून घेतली होती. व्यवसायाची 10-12 वर्षे उलटल्यानं तिनं झेपतील तेवढे रुग्ण पाहण्याची शिस्त लावून घेतली होती. स्वतःसाठी वेळ जपला होता. सकाळी ट्रॅकसूट घालून ती मैत्रीणींबरोबर जॉगिंगलाही निघे. एक दिवसआड दोघही जिमला जात. कधी मित्रांबरोबर चहा, स्वयंपाक आणि झाडझुडीला स्वतंत्र बायका, दवाखान्यात साफसफाईला वेगळी बाई, स्वागतिका, मदतनीस डॉक्टर, असा कर्मचारी वर्ग.
सासून आल्या आल्या तिच्या ‘उधळेपणावर ‘ तोंडसुख घेतलं. ‘नुसत्या बिनकामाच्या बसल्या राहतात बाया !त्यांना फुकटचा पगार ‘. सुनेला ऐकू जाईल अशा आवाजात ती भावजयीशी फोनवर बोले. मग कधी पार्टीला जायचं तर ‘कुठे चाललात ?’, ‘कधी येणार ? ‘इतका उशीर का ?’, ‘तुला फोन आला तो कुणाचा होता? ‘ अशा चौकशा चालायच्या. दवाखान्यात उगाच डोकावून जाणं, दवाखान्याच्या माणसांना परस्पर आपल्या कामाला जुंपणं, देवळात जाण्यासाठी मोटर, ड्रायव्हर असा जामानिमा वापरणं, अशा गोष्टी चालत.
त्याबद्दल सुनेचा आक्षेप नव्हता, किमान तिच्या कानावर घालावं अपेक्षा काही चूक नव्हती. ते व्यवस्थित शब्दात बाहेर नवऱ्याने आईला सांगावं अशी तिची इच्छा. त्यावर नवऱ्याचे उत्तर ठरलेलं – ‘सोडून दे. इतकी वर्ष ती बदलली नाही. आता काय बदलेल ? आणि सांगणार कोण तिला ? वर्षातून दोन ते तीन महिन्याचा प्रश्न आहे.’
अनेक प्रथा परंपरा का मागे पडतात ? कारण त्या काल सुसंगत नसतात. माणसांचही तसंच. वयोवृद्धांची पिढी सर्वार्थाने अभावात जगली. त्यांच्या मुलांची- आत्ताच्या मध्यमवयीन पिढी मात्र उच्च महत्त्वाकांक्षा ठेवून जगली. अशा माणसांमध्ये वादाच्या ठिणग्या पडणारच. विस्तवाच्या दोन्ही बाजूस स्त्रिया असतील, तर घरातल्या पुरुषांनी वाईटपणा न घेता दूर जाऊन बसण, हे चित्रही नेहमीचंच !
नवरा, त्याची आई आणि त्याची पत्नी यांचीही गोष्ट अशीच आहे! वादाचा विस्तव शांत करण्यात त्याच्या बायकोला यश आलं ते पण जेव्हा त्यांना होमिओपॅथिक औषध सुरू केले त्यानंतरच ही गोष्ट प्रकर्षाने घडून गेली, जी या अगोदरच मुलाने करणे गरजेचे होते.
दिवसभर घराबाहेर राहणाऱ्या नवऱ्याला “दुर्लक्ष कर” सांगणं सोपं होतं, पण येता जाता रस्ता अडवून बसलेल्या सासूकडे लक्ष जाऊ न देणे सुनेला अशक्य होतं. अशावेळी पूर्वग्रह निर्माण झालेल्या माणसाचं मन अधिकच संवेदनशील होऊन जातं. छोटीशी गोष्ट ही मनाला क्लेश देऊन जाते.
एके दिवशी अशीच छोटी घटना घडली. पण नवऱ्यानं जे आयुष्यभर टाळलं ते करण्याची वेळ येऊन ठेपली आहे हे सुनेनं ओळखले.
गॅसवर दूध ठेवून ती बैठकीत आली, तेव्हा टीव्हीवरती विम्बल्डनची अंतिम फेरीची मॅच सुरू होती. टेनिस तिचा आवडता खेळ. समोर फेडरर आणि नदाल. तिची तंद्री लागली. सासू डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहत होती. सकाळची काम सोडून टीव्ही पाहत बसलेली सून तिला अर्थातच खटकत होती. तेवढ्यात स्वयंपाक घरातून फर्र-फर्र आवाज आला. सारं दूध उतू गेलं. सून धावली. तोवर गॅस विझला होता. सासू मात्र पेटली ! “कुठे लक्ष असतं तुझं ? सकाळची घाईची वेळ काय टीव्ही पाहायची वेळ आहे का ? एवढे लिटरभर दूध वाया गेलं !”
सुनेने ओट्याकडे पाहिलं. सांडलेलं दूध व्यवस्थित एका स्टीलच्या भांड्यात गोळा केलं. मांजरीच्या ठरलेल्या कोपऱ्यात नेऊन ठेवलं. कोटा आणि गॅस स्वच्छ केला. फोनवर नोकराला लिटरभर ताज दूध आणायला सांगितलं. सासू धुमसतच होती, तिच्या पुढ्यात सून येऊन बसली.
“हे बघा सासूबाई, तुमचं वय (78) अष्टयाहत्तर , माझं वय (57) सत्तावन्न. माझी पाळी जाऊन आठ वर्षे झाली. मला सून आली आहे, जावई आहे आणि नातवंडे आहे. हे घर जेवढं तुमच्या मुलाचं आहे, तेवढेच माझंही आहे. तुम्हाला लक्षात येत नसली, तरी माझी कमाई तुमच्या मुलाइतकीच आहे. अनेक स्त्रियांना मी अवघड बाळंतपणातून सोडवलंय. अनेकांच्या व्याधी बऱ्या केल्या आहेत. माझं क्षेत्र अतिशय तणावयुक्त आहे. त्यात धडधाकट रुग्णाला अचानक काय गुंतागुंत होऊ शकेल याचे निदान करणं कठीण.
अशा स्थितीत माझ्याही मनाला विरंगुळा हवा. मी जे कमावते, त्यात अशा किरकोळ चुका आणि नुकसान अतिशय क्षम्य, नगण्य आहे हे समजून घ्या. पैसा वाया जायला नको याची तुमच्यापेक्षा जी घामाचा कमवते तिला अधिक जाणीव असते, हे लक्षात घ्या. सासूच्या भूमिकेतून बाहेर या. मला स्त्री म्हणून पाहा. मुलगी असती तर पाहिलंच असतं ना ? तुमच्या पिढींना जाच सोसला, म्हणून पुढच्या पिढीला त्याची चुणूक मिळालीच पाहिजे, हा विचार सोडा. माझा व्यवसाय मी बराचसा माझ्या सहाय्यकाकडे सोपवलाय, तसा हा संसारही माझी मला करू द्या.” सून थांबली.
रुढी वाईट का ठरतात ? कारण त्या कालसुसंगत राहत नाहीत. पिढ्या वाईट का ठरतात ? कारण त्या कालसुसंगत वागत नाहीत. मात्र माणूस म्हणून कालातीत असे काही मुद्दे आहेत. जग किती बदललं तरी स्त्रीच शरीर त्याच स्थित्यंतरातून जात असतं, हे जीवशास्त्रीय सत्य. मग केवळ पिढ्या बदलल्या म्हणून दोन स्त्रिया एकमेकांना समजून का घेत नाहीत ? की स्त्री असणं हेच स्पर्धेचं, शत्रुत्वाचे कारण ? यापुढे वयाचा एक टप्पा यावा ना, जेव्हा शारीरिक सारी संसारिक वादळं शमून स्त्री-पुरुष हे द्वैतही संपाव…… फक्त माणुसकीचे नातं उरावं.
अशा विचारसरणीला जी मनोभूमी असावी लागते ती तिच्या सासूच्या ठाई नव्हती हे उघडच होतं. मात्र सून काही बोलली नाही. उतू गेलेल्या दुधाबरोबरच आपली सद्यी उतू गेलीय याची सुनेला जाणीव झाली. तिच्या स्त्रीत्वाला जाग आली आणि वयानं यावं अशा शहाणपणालाही.
होमिओपॅथिक औषधांनं तिच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे बळ दिलं. बरेच दिवस समतोल साधण्याचा तिने शांत राहून प्रयत्न केला होता, पण वेळ आल्यानंतर तिनं आपल्यावरचा अन्याय सहन न करता भिडण्याचा,सामोर जाण्याचा मार्ग पत्त्करला. !!