सर्वव्यापी भीतीवर होमिओपॅथी
मानवी मन हे एक न सुटलेलं कोडं आहे कारण ते अनेक भावभावनांचा गुंता असलेलं आहे. कोणतीही एक भावना स्व-स्वरूपात एकटी नसते कारण आणि परिणामरुपात प्रत्येक भावना इतर भावनांच्या आगे-मागे रेंगाळत असते.
भीती या भावनेचा विचार करायचा तर रोजच्या जगण्यात वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर ती काळजी, तणाव अस्वस्थतेच्या रूपात सतत सोबत असते. मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे भीती.
‘भय इथले संपत नाही……’हे पटतं बऱ्याचदा.
भीतीची आणि मनुष्याशी फार जुनी मैत्री आहे. तिला दूर करायचा कितीही प्रयत्न केला तरी ती त्याला सोडत नाही. ” नेमिची येतो मग पावसाळा “सारखं वादळ-वारा, विजा, गडगडाट, धुवांधार पाऊस ……हे सर्व नेहमी अनुभवाला येणारं. तरी या वातावरणात भीतीही नेमानं मनाचं दार ठोठावत येते. भीतीला मनुष्याच्या मनाचा रस्ता इतका सवयीचा झालाय की, अशी कुठली चिन्हं जरी दिसली तरी ही सरळ येते मनात.
तसं बघायला गेले तर, भीती सर्वव्यापी नसतेच. तिच्याशिवाय इतर बरच काही अनुभवता येऊ शकतं.
उदाहरणार्थ – “अंग दुखतंय “ असं आपण म्हणतो, तेव्हा दुखून लक्ष वेधणारा अवयव एखाद-दुसराच असतो. बाकी सर्व अवयव मजेत असतात. तसंच काहीसं…….
भीती सोबत करत असते. आपल्याला रोखून धरते, पण बाकी सर्व ठीक चालू असतं; म्हणजे ती भीती सर्वव्यापी नसते असंही लक्षात येतं.
भीती फक्त “असं झालं तर……..” अशा कल्पनाचं बोट धरून मनात शिरत असते आणि आपल्याला सावध करत असते.
भीती ही एक आवश्यक भावना आहे खरं तर. लहान मुलांना ‘पडशील’, ‘लागेल’, ‘भाजेल’, ‘कापेल’, असे म्हणतो तेव्हा न कळत भ्यायला शिकवत असतो. मुलांच्या मनात धावण्याशी, पडण्याशी, सुरी-कात्रीशी कापण्याशी, सांगड घातली जाते. यातून मुलं त्याच्या संदर्भात काळजी घ्यायला शिकतात, पण कधी कधी एखाद्या गोष्टीची मनात कायमची भीती बसू शकते.
मग ‘डर के आगे जीत है’ असं समजवावं लागतं. साहस करायला प्रोत्साहन द्यावं लागतं. मुलांना घडवण्याच्या या दोन पातळ्यांवरच्या दोन प्रक्रिया आहेत.
घरातले संस्कार ‘जीन्स’ मधून आलेलं पूर्वसंचित आणि जगताना येणाऱ्या अनुभवातून आपण घडतो. व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात.
कोणाला पाण्याची भीती वाटते, कोणाला अंधाराची भीती वाटते. कोणाला लोक काय म्हणतील याची…….
धीट माणसालाही कसली ना कसली भीती वाटत असते. तो गर्दीत शिरून भांडण सोडवेल, अपघातग्रस्ताला अशक्य वाटणारी मदत करेल, पण त्याला स्टेजवर उभे राहून बोलायची भीती वाटू शकते. मी ही घाबरट आहे. बऱ्याच गोष्टींची मला भीती वाटते. पण लोक काय म्हणतील याची मला भीती वाटत नाही …..
आपल्याला बऱ्याचदा अकारणच भीती वाटते अस्वस्थ करते. ती रिकामेपणाची भीती असते. माणसाला जाणीव असते आणि जाणीव आहे याचेही भान असतं.
या विश्वातील इतर सर्व घटक विश्वाचा अविभाज्य भाग असतात. पण जाणीव असल्यामुळे माणूस एकूण अस्तित्वाचा अविभाज्य भाग होऊ शकत नाही. तो वेगळेपणाने विश्वाकडे आणि स्वतःकडेही पाहू शकतो. या जाणिवेला सतत काहीतरी विशेष विषय लागतो. तो मिळाला नाही की माणूस अस्वस्थ होतो. त्याला तर रिक्ततेची भीती वाटते.
माणसाच्या स्वरूपाचा शोध घेणाऱ्या अस्तित्ववादी लेखनात या अवस्थेला Anguish म्हटलं आहे. अस्तित्ववादी कादंबऱ्यातील नायक अशी अस्वस्थता अनुभव जगण्याचा अर्थ शोधत असतो, मी इथे का आहे ? असा निरुत्तर करणारा मूलभूत प्रश्न त्याला पुन्हा पुन्हा निरर्थकथेच्या गर्दीत ढकलत राहतो !
विचार करणाऱ्या सर्जक मनाला अशी भीती व्याकुळ करते. सर्वसामान्य माणूसही व्याकुळ करणारी अशी भीती अनुभवत असतो, पण बहुतांश माणसं तिला सामोरं न जाता तिच्यापासून पळ काढतात.
जगताना भेडसावणाऱ्या अशा सगळ्या निवृत्त प्रश्न करणाऱ्या प्रश्नांना “ईश्वर” हे तयार उत्तर पळ काढण्यासाठी सहज उपलब्ध असतं. वेगवेगळ्या प्रकारच्या भीतीमधून आधार देणाऱ्या ईश्वराची निर्मिती झाली. कुणीतरी विश्वनियंता आहे ही भावना दिलासा देणारी असते. भवितव्याबद्दलच्या काळजीतून भीती निर्माण होते. ती अस्वस्थ करते. मानवी प्रयत्न अपुरे पडतात. कित्येकदा परिस्थिती हाताबाहेर जाते अशा कोणत्या वेळेस शरण जावं, आधार घ्यायला धाव घ्यावी, असं समर्थ ठिकाण ईश्वर रूपात आपल्या हाताशी असतं. असे आधार गृहीत धरून बहुतांश माणसं स्वतःला सावरत, कोणाच्या वाट्याला न जाता जगत असतात.
काही दादागिरी करत असतात. त्यांचं वागणं घाबरवणारं असतं. पण खरंतर ती स्वतःच आतून घाबरलेली असतात. त्यांना त्यांचा अहंकार त्यांना ते मान्य करू देत नाही. वरवर दिसणाऱ्या त्यांच्या मुळाशी भीती असते. मोठ मोठ्या लढाया, महायुद्ध, स्वतःच वर्चस्व स्थापित करण्यासाठी होत असतात. अशी आक्रमणं, अत्याचार करणाऱ्या क्रूर वृत्तिंच्या मुळाशी ही भीतीच असते. आपल्याला कोणी शह देऊ नये, आपल्या स्थानाला धक्का लागू नये म्हणून अशी दहशत पसरवली जाते की कोणी मान वर करून बघू नये, विरोधी बोलू नये, लिहू नये….
आक्रमकता, हिंसा, भीती, प्रेम, द्वेष, राग ….. अशा मानवी भावना एकमेकीत गुंतलेल्या असतात. माणसं, घटना, प्रसंग समजून घेताना ही गुंतागुंत समजून घ्यावी लागते. त्यासाठी ” इमोशनल इंटेलिजन्स ” ची गरज असते. बऱ्याचदा माणसाला त्याच्या क्षमतांची जाणीव करून द्यावी लागते.